लिंगायत हेच सत्य!
- रमजान दर्गा
” मी शैव होतो, वीरशैव झालो असे बसवण्णांनीच म्हटले आहे. त्यांच्या वचनांत कोठेही लिंगायत पदाचा वापर झालेला नाही ” असे पंचाचार्य आणि चिदानंद मूर्ती यांच्यासारखी मंडळी सांगतच आहेत. त्यामुळे साहजिकच लोकांच्यात गोंधळ निर्माण होत आहे.
बारावे शतक‘वचनयुग’ म्हटले गेले, तर पंधरावे शतक ‘वचन संकलन युग’ म्हटले जाते. ह्या संदर्भात बसवण्णा, अल्लमप्रभू आणि चेन्नबसवण्णा यांची वचने षट्स्थलानुसार वर्गीकरण करून हस्तप्रती सिद्ध करण्यात आल्या. ह्या तिघांची वचन संपुटे मठांमध्ये, विद्वानांच्या आणि श्रीमंतांच्या घरांमध्ये विराजमान झाली होती. याच कारणामुळे सदर षट्स्थल वचन संपुटांमधील वचनांमध्ये आपल्या इच्छेनुसार ढवळाढवळ करण्याचे साहस प्रतिगामी शक्ती करू शकल्या नाहीत. परिणामी, ह्या तिघांच्या षट्स्थल वचनांमध्ये कोठेही चुकूनसुद्धा ‘वीरशैव’ पद वापरले गेलेले नाही!
शरणांविषयी भक्तिभाव असलेले तेराव्या शतकातील साहित्यिक हरिहर, राघवांक आणि केरेय पद्मरस यांच्या साहित्यकृतींमध्येसुद्धा
‘वीरशैव ‘ पदाचा वापर झालेला नाही. बसवण्णांचे समकालीन असलेल्या पंडिताराध्य यांच्या ‘शिवतत्त्वसारमु’ ह्या तेलुगू रचनाकृतीमध्येसुद्धा ‘वीरशैव’ हे पद आढळून येत नाही.
पाल्कुरिके सोमनाथाच्या तेलुगू बसव पुराणामध्येही वीरशैव पद वापरलेले नाही! ह्या कृतीच्या आधाराने लिहिलेल्या
इ. स. 1368 मधील ‘बसव पुराण’ मध्ये ( पाल्कुरिके सोमनाथाच्या बसव पुराणमुमधील ‘वीरमाहेश्वर’ पदाऐवजी ) भीमकवीने ‘वीरशैव’ पदप्रयोग केला आहे.
षट्स्थल वचन संपुटांत एकदासुद्धा कुठेही न आढळून येणारे ‘वीरशैव’ पद कसे कोणास ठाऊक, अतिरिक्त वचनांमध्ये (हेच्चिन वचनगळु) मात्र शिरल्याचे दिसून येते. याविषयी चिंतन करण्याची गरज आहे. षट्स्थल वचन संपुट सिद्ध होत असताना ‘वीरशैव’ शब्दाला वचन साहित्यात महत्त्व नव्हते. त्या वेळी ‘वीरशैव व्रत ‘ मात्र प्रचलित होते. त्या काळी ते शैव धर्माची एक शाखासुद्धा नव्हते. केवळ एक व्रत बनले होते. ह्या व्रतासंबंधी सुद्धा शरणांना तिरस्कारच होता. म्हणूनच बसवण्णांची समकालीन वचनकर्त्री शरणी अमुगे रायम्माने म्हटलेय की, “सर्वागम श्रुती स्मृती पुराणपाठक झाले तरी काय? सर्वमंत्र तंत्र सिद्धी मर्म जाणले तरी काय? नित्य त्रिकाल शिवार्चन नाही. नित्य पादोदक प्रसाद सेवन नाही. हे कसले वीरशैव व्रत? हे कसले जन्मसाफल्य,अमुगेश्वरा?” अशा प्रकारे वीरशैव व्रताची हेटाळणी केली आहे.
हे वीरशैव व्रत आचरण करणाऱ्यांना ‘वीरव्रती’ असे संबोधले जात असे. बसवण्णांनी ह्या वीरव्रतींच्यावर सूचकतेने टीका केली आहे. “वीरव्रती भक्त म्हणून स्तुती करून घेता; मग तुम्ही घ्या हो ऐकून! वीर असल्यास वै-यानीसुद्धा वाहवा केली पाहिजे. व्रती असल्यास स्त्रियांनी कौतुक करायला हवे. भक्त असल्यास जंगमाने पाठ थोपटली पाहिजे. “
ह्या वचनाद्वारे बसवण्णांनी “वीरव्रती म्हणवून घेणारे भक्त वीरही नव्हेत, व्रतीही नव्हेत आणि भक्तही नव्हेत “ असे सूचित केले आहे. शरणांनी वीरशैव व्रत व वीरव्रती यांचा तिरस्कार केला होता याला ही वचने साक्ष देतात.
शरणांनी स्थापन केलेला क्रांतिकारी वचनोक्त लिंगायत धर्म वीरशैववाद्यांनी आपल्या कबजात घेऊन पंधराव्या शतकात आपला आगमोक्त वीरशैव धर्म उचलून धरला. त्याच वेळी त्यांचा धर्मग्रंथ असलेल्या ‘सिद्धान्त शिखामणी’ ची रचना झाली. ह्या पार्श्वभूमीवर वीरशैव पदाचा जास्तीतजास्त वापर सुरू झाला. त्यानंतर शरणांच्या अतिरिक्त वचनांमध्ये शक्य होईल त्या सर्व ठिकाणी लिंगायत आणि लिंगवंत पदाऐवजी वीरशैव पद मिसळून वचनांच्या हस्तप्रती तयार करण्यात आल्या.
तथापि, त्यांना बहुप्रचार झालेल्या षट्स्थल वचन संपुटांत एकाही ठिकाणी वीरशैव पद घुसविणे शक्य झाले नाही ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट होय.
वचनांमध्ये लिंगायतपेक्षा लिंगवंत पदाचाच जास्त प्रमाणात वापर झालेला आहे. कारण,
लिंग अंगावर आयत केले की त्यास लिंगायत म्हटले जाते. हा पहिला टप्पा. दुसरा टप्पालिंगस्वायत, तिसरा टप्पा लिंगसन्निहित. हे तिन्ही टप्पे पार केलेला तो लिंगवंत. लिंगायतपासून आरंभ होऊन लिंगवंतमध्ये पर्यवसान होत असल्याने वचनांमध्ये लिंगवंत पदाचाच जास्तकरून वापर झाला आहे. लिंगवंतचे मूळ लिंगायतमध्ये आहे. त्यामुळे जनमानसात ‘लिंगायतरु’ हेच पद ठसलेले आहे.
बाराव्या शतकात बसवण्णांनी लिंगायत धर्म स्थापन करण्यापूर्वी स्थावरलिंग आणि त्याचेच छोटेसे रूप असलेले चरलिंग वापरात होते. बसवण्णांनी चळवळ रूपात जात्यतीत लिंगायत धर्म स्थापनेबरोबर इष्टलिंगाचा आविष्कार घडविला. म्हणूनच ‘बसवण्णांच्या उदरी जन्मले लिंग ‘ असे चेन्नबसवण्णांनी आपल्या वचनात म्हटले आहे. ” तुला मी जाणून घेण्यापूर्वी तू कोठे होतास “ असे बसवण्णांनी इष्टलिंगाला उद्देशून म्हटले आहे.
“पत्करलेला शैवमार्ग नाकारून मला सत्य वीरशैवाचाराची जाणीव करून दिलेले. …..” असे चेन्नबसवण्णांशी संबंधित बसवण्णांचे एक वचन त्यांच्या अतिरिक्त वचनांमध्ये आहे. तेच पुढे करून पंचाचार्य आणि वीरशैववादी नेहमी वाद घालतात. परंतु ह्या ओळी शैवमार्गाला विरोध करणाऱ्या आहेत.
अठ्ठावीस आगमांच्या मुळातून उगम झालेल्या सप्तशैवांपैकी वीरशैव ही एक उपशाखा आहे. अनादीशैव, आदिशैव, महाशैव, अनुशैव, अंतरशैव, प्रवरशैव आणि अंत्यशैव असे शैवांचे सात प्रभेद आहेत. अशा प्रकारे सप्तशैवांमधून सामान्य शैव, मिश्र शैव, शुद्ध शैव आणि वीरशैव अशा चार उपशाखा निर्माण झाल्या.
वीरशैवांमध्ये सामान्य वीरशैव, विशेष वीरशैव, निराभारी वीरशैव असे तीन प्रकारचे वीरशैव आहेत. आगमोक्त शैव शाखा – उपशाखांचा लिंगायतशी संबंध नाही. बसवण्णांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म बसवादी शरणांच्या वचनरूपी नववाणीचा धर्म बनलेला आहे. शरणांच्या अनुभवाद्वारे अनुभावाची उंची गाठलेल्या वचनांमधून लिंगायत उदय पावलेला आहे. परंतु अनेक जणांनी लिंगायतसाठी वीरशैव पदाचा समानार्थी म्हणून वापर करून गोंधळ माजविला आहे.
” वेदांना बासनात गुंडाळून टाकेन “ असे सांगण्याद्वारे बसवण्णांनी वेदोक्त वैदिक धर्म तिरस्कृत ठरविला आहे. “आगमांचे नाक कापेन “ असे म्हणण्याद्वारे आगमोक्त शैव धर्म तिरस्कारला आहे. वेद आणि आगमांवर विश्वास ठेवणारा ‘वीरशैव’ बसवण्णांना मान्य असणे कसे शक्य आहे?