Menu
Lingayat World
  • महिला सबलीकरणाचे जागतिक प्रथम प्रणेते – महात्मा बसवण्णा
  • लिंगायत विरुद्ध वीरशैव वादाचे विवेचन
  • लिंगायत हेच सत्य!
Lingayat World

अष्टावरण

Posted on February 4, 2019

अष्टावरण

आवरण म्हणजे कवच व आठ गोष्टीचे आवरण म्हणजे अष्टावरण.
लिंगायतांचे दोष समूळ निणारण्यासाठी आपल्या कार्यात सतत जागृत असणारे आचरण किवा रक्षाकवच म्हणजे अष्टावरण.
“अष्टावरण हे आध्यात्मिक आनंदमय अनुभवाचे आठ खांब आहेत.हे आठ खांब मानवी जीवणाचे आध्यात्मिक उत्तुंग शिखरावर पोहचविणारे आहेत.

🔯🌷 गुरु 🌷🔯

महात्मा बसवण्णांनी “अरिवे गुरु” म्हणजे ज्ञान हाच गुरु असे सांगितले आहे.
मानवाच्या उत्कर्षाचे एकमेव साधन म्हणजे ज्ञान याच ज्ञानाने मानवी जीवन समृद्ध बनवता येते हे महात्मा बसवण्णांनी स्पष्ट सांगितले आहे.
ज्ञानाने गुरुत्व प्राप्त होते व वंश परंपरेने ते प्राप्त होत नाही.
जो ज्ञानी आहे व त्याचे ज्ञान मानवाला व समाजाला उत्कर्षाकडे घेऊन जाते तोच ज्ञानी हा गुरु होय.
व अशा गुरुनांच गुरु म्हणावे व अशा गुरुचेच शिष्यत्व स्विकारावे.
ज्ञानी गुरु विषयी महात्मा बसवण्णा गुरुवर संपूर्ण श्रद्धा विश्वास ठेवून गुरुला सर्वोच्च सर्वश्रेष्ठ स्थान दिले आहे.
इष्टलिंग धारणा करताना गुरु कडूनच ती धारण करावी अशी त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.ते आपल्या वचनात म्हणतात
“लिंगधारणा व्यर्थची,गुरुवचनावीना.भ्रष्ट दोघे लिंगधारी तैसे,गुरु वचनाविना करंटा भ्रष्ट जाणा भूमंडळी,
कूडलसंगमदेवा”
म्हणजे गुरु च्या ज्ञानधारणे विना व इष्टलिंग पुजेतील पूजा अर्चा ही व्यर्थ आहे.
पण महात्मा बसवण्णांचा गुरु हा मंत्रतंत्रात गुफटलेला,पुराण-शास्त्रातील पुराण कथेत अडकलेला नव्हता तर ज्ञानी,सदाचारी,समानतावादी,स्वताः कायक करुन जीवण जगणारा,आपले आदर्श शिष्यासमोर ठेवणारा व सकल मानवाचे हित साधणारा होता.
गुरु आणि शिष्य यांचे संबंध तेजस्वी सुर्यासारखे तेजोलिल सुर्यप्रकाशासारखे स्वच्छ असायला हवे.
गुरु आणि शिष्य यांच्या संबंधा विषयी षटस्थल चिन्मयज्ञानी चन्नबसण्णा म्हणतात,
“गुरु-शिष्य संबंधास कशाची उपमा द्यावी तर,
ज्योतीतून मिळालेल्या ज्योतीसम असावे,
दर्पणात दडलेल्या प्रतिबिंबासम असावे,
स्फटिकात ठेवलेल्या संबंधासम असावे,
रुपाच्या आणि छायेच्या संबंधासम असावे,
ह्या कारणे,कूडलचेन्नसंगय्या
दर्पणाला दर्पण दाखविणारे असावे”.
अशा प्रकारे गुरु चे श्रेष्ठत्व स्पष्ट केले आहे.

🔯🌷 लिंग 🌷🔯

इष्टलिंग हे अगम्य,अगोचर,अप्रतिम शिवाचे विश्वरुपी,सर्वव्यापी चेतन्याचे प्रतिक आहे.
इष्टलिंग हे शिवशक्तीचे स्वरूप आहे.याच इष्टलिंगास अनादी,अनंत,सत्य,सुंदर तत्व म्हणजे इष्टलिंग.
इष्टलिंग हे एकेश्वर भक्तीचा व देहाला देहालय बनविणारा मध्ययुगुन युगात सर्वाना धार्मिक अधिकार देऊन धार्मिक समानता आणणारा अविष्कार होय.
महात्मा बसवण्णांनी इष्टलिंग धारणेच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता,जात-वर्ण-लिंग भेद विरहित समाज,गरीब-श्रीमंत,स्पृश्य -अस्पृश्य अशा स्वरूपाच्या भेदभावातून मुक्त करुन सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे कार्य इष्टलिंग धारणा माध्यमातून केले आहे.
इष्टलिंग हा लिंगायताचा मुख्य गाभा आहे.लिग धारण करणारा तोच लिंगायत ही ओळख आहे.
लिंगायतांना इष्टलिंग किती आवश्यकता आहे हे महात्मा बसवण्णा आपल्या वचनातून स्पष्ट करताना म्हणतात,
“लिंगाशिवाय चालणारे,लिंगाशिवाय बोलणारे,
लिंगाशिवाय थुंकी गिळली तर तीही विष होते.
काय सांगु ? कसे सांगु ?
लिंगाशिवाय चालणाऱ्यांचा देह,लौकिक,नच स्पर्शावा.
लिंगाशिवाय जिव्हेवरील शब्द म्हणजे सुतक,
ते न ऐकावे.
लिंगधारणेविना जगणे म्हणजे त्या प्रत्येक बोलण्या चालण्यातील व्रतभंगा आहे,
कूडलसंगमदेवा.

अशा प्रकारे महात्मा बसवण्णांनी लिंग हाच लिंगायताचा आत्मा आहे हे स्पष्ट केले आहे.

🔯🌷 जंगम 🌷🔯

लिंगायतांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी व सकल जीवाचे कल्याणकारी विचारांचा तसेच वचनसाहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी जंगम हा अष्टावरणातील समाज व मानव यांच्यातील सुवर्ण दुवा म्हणजे जंगम.
जंगम हा पुर्णवेळ समाजाला सेवा देणारा सेवाधारी जनसेवक होय.तो स्वताः ज्ञानप्राप्ती करुन ते ज्ञान व आध्यात्मिक विचार सोपे,सहज,सुलभ करुन समाजापर्यत पोहचविण्याचे कार्य जंगम करत असे.
जंगमाने आपले पुर्ण जीवन समाजासाठी वाहून घेतलेले असल्यामुळे त्यांच्या सांघिक प्रयत्नामुळे समाज व्यवस्था बदलून नविन अंधश्रद्धा,जात-वर्ण-लिंग भेद,उच्च निच,गरिब-श्रीमंत हा भेद नष्ट होऊन नविन आधुनिक विचारांचा समाज बनविण्याचे श्रेय निश्चितपणे जंगमांनाच जाते.
महात्मा बसवण्णांनी जंगमांना लिंगायत तत्त्वज्ञान,धार्मिक व आध्यात्मिक कार्यात जंगमांना सर्वोच्च स्थान दिले आहे.लिंगायत धर्म सिद्धांत सर्वसामान्य जनमाणसात पोहचवित असताना धार्मिकतेत सहजसुलभता आणणारे जंगम हे समाजपरिवर्तनचा धार्मिक क्षेत्रातील मुख्य पाया आहे.हे स्पष्ट करत असताना महात्मा बसवण्णा जंगमाप्रती चे त्याच्या हृदयातील स्थाना व जंगमाचे अतिउत्कृष्ट कार्याबद्दल आपल्या वचनात म्हणतात,
“जंगमरहित लिंगपूजा,फुटक्या खापरीवर जलसिंचनागत,
जंगमासह लिंगपूजा,हाच खरा भक्तीमार्ग असे.
जंगमप्रसाद जंगमासह भोगणे,मानी मी लिंगपूजा.
दुसरी न जाणे मी,जाणिल्यास
कूडलसंगमदेव नरकात ढकलेले.
अशा प्रकारे धार्मिक लिंगधारणा असु द्या किंवा सामुदायिक लिंगपूजा असु द्या त्या जंगमासहितच कराव्या असे महात्मा बसवण्णा म्हणतात.
पण जंगम हे धार्मिक, अध्यात्मीक,समानतावादी सर्वगुणसंपन्न समाजपरिवर्तन करणारा असावा.फक्त भिक्षा हेच साधन आहे हे माणुन धर्मद्रोह करणारा नसावा

🔯🌷 पादोदक 🌷🔯

पादोदक म्हणजे लिंगारती सोडलेले पाणी होय. पण याचा मुळ अर्थ हा गुरु ने किंवा जंगमाने आपल्या आध्यात्मिक दृष्टीने,पवित्र व शक्तीमय,मानव व समाजउपयोगी जे ज्ञान दिले आहे त्या ज्ञानाचे पादोदक रुपात स्वीकार करणे होय.
पादोदक म्हणजे पाय धुऊन पाणी पिणे नव्हे तर ज्ञानी गुरु,जंगमाच्या ज्ञानाचे इष्टलिंगाला प्रमाण माणून सेवन करणे होय.
पादोदक म्हणजे ज्ञान व याचे महत्त्व स्पष्ट करताना शिवयोगी सिद्धरामेश्वर आपल्या वचनात म्हणतात की,
“पादोदकाचे स्वरुप परमात्म्याचे चिदरुप पहा.
पादोदक हाची मोक्षमार्ग पहा.
पादोदक हेचि पाप नष्ट करे पहा.
पादोदक हाचि कपिलसिद्ध मल्लिकार्जुनाचा महिमा पहा.

म्हणजे इष्टलिंग रुपी पादोदक[ज्ञान] घेतल्यास शारीरिक व मानसिक दोष नष्ट होतात.
पादोदक हे समतेचे प्रतिक आहे हे स्पष्ट करताना चन्नबसण्णा आपल्या वचनात म्हणतात,
“करुनजल.विनयजल,समताजल.
करुणाजल हेच गुरु पादोदक,विनयजल हेच लिंगपादोदक
समताजल हेच जंगमपादोदक
गुरुपादोदकाने संचीतकर्म नष्ट होई.
लिंगपादोदकाने प्रारब्धकर्म नष्ट होई.
जंगमपादोदकाने अगामीकर्म:-D नष्ट होई.
अशा विविधोदकाने त्रिविधकर्म नष्ट होई.
म्हणून कूडलचेन्नसंगमदेवा तुमचे शरण जाणती त्रिविधोदकाची महानता
अशा प्रकारे पादोदकाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

🔯🌷 प्रसाद 🌷🔯

लिंगायताने गुरु,लिंग,जंगम यांच्या कृपेने समर्पणभावनेतून प्राप्त होते त्याला स्वीकारणे व त्या स्वीकारलेला भावनेने जीवन जगणे म्हणजे प्रसाद होय.
हा प्रसाद,आध्यात्मिक स्वरुपात असतो,सर्वगुणसंपन्न ज्ञानाच्या स्वरूपात असतो,शुद्ध कायक करुन मिळणाऱ्या अन्नाच्या स्वरुपात असतो.हा प्रसाद गुरु,लिंग,जंगम यांना समर्पक मानुन तो स्वीकारायचा असतो.
धार्मिकते बरोबरच प्रसादाला समाजशास्त्रीय महत्त्व आहे.प्रसादाच्या नीमित्य साधुन सर्व स्तरावरील लोकांना एकत्र सहभागी करुन घेया येतात.त्यामुळे जातीभेद,वर्णभेद,उच्च -निचता,गरीब -श्रीमंत हा भेद विसरून त्याच्यात समानता,मानवता निर्माण होण्यास मदत होते.आणि महात्मा बसवण्णाना हेच अपेक्षित होते.
प्रसाद हा कशा प्रकारचा असावा हे महात्मा बसवण्णा आपल्या वचनातून स्पष्ट करताना म्हणतात,
“लिंगमुखाने आलेल्या प्रसादाविना दुसरे काही घेतले तर
तुमची शपथ,तुमच्या प्रमांची शपथ.
लिंगार्पित न केलेल्या जलाने चुळ भरली तर
तुमच्या गणाचाराला मान्य होणार नाही.
लिंगार्पिताविना गवताची काडीही घेणार नाही.
तुम्हांला घेतलेल्या हाताने दुसरे काही मागणार नाही.
असे केले नाही तर शिरच्छेद-शिरच्छेद
कूडलसंगमदेवा
अशा प्रकारे प्रसादाचे महत्व व प्रसादातील समर्पक भाव महात्मा बसवण्णांनी स्पष्ट केला आहे.

🔯🌷 विभूती 🌷🔯

लिंगायत व्यक्तीच्या शरीरावर धर्माचे चिन्हाकिंत स्वरुपाचे प्रतीक म्हणुन विभूती हे आवरण धारण केले जाते.
विभूती धारण हे लिंगायतांच्या समानतेचे तत्व आहे. लिंगायत धर्मीय सर्व स्त्री – पुरुष,लहान थोर,गरीब श्रीमंत उच्च – निच असा कोणताही भेदभाव न करता सर्वजण ते आपल्या कपाळावर धारण करतात.
विशेषतः आनंदाचा क्षण असो वा दुःखाचा क्षण असो विभूती हे सर्व सिद्धीचे कारण मानून ते धारण करतात.
इष्टलिंग योग असो वा सामुदायिक इष्टलिंग पुजा असो विभूती हे आवश्यक घटक असते.
लिंगायतांना विभूती कपाळावर असणे हे किती आवश्यक आहे हे महात्मा बसवण्णाच्या वचनावरुन स्पष्ट होते ते म्हणतात,
“त्रिपुंड भस्म नाही याच्या भाळी,
पाहु नये प्रभाती तोंड त्यांचे,
लिंगदेव नाही,ऐशा ठिकाणी नको तिथे जाणे,
नरविंद्य कूडलसंगमदेवा
मक्तिविन गाव,तुझा अभाव,भकास ते”
विभूती धारणे शिवाय कोणतेही साध्य,तप,जप,कार्य हे शुन्य आहे हे स्पष्ट करताना महात्मा बसवण्णा म्हणतात,
श्री विभूतीविना तप करीता,ती तपसिद्धी शुन्य,
श्री विभूतीविना दिक्षा घेता,ती दीक्षा शुन्य,
श्री विभूतीविना मंत्र उच्चारता,ती मंत्रसिध्दी शुन्य,
श्री विभूतीविना देवार्चना करीता,ती देवार्चना शुन्य,
श्री विभूतीविना विद्यार्जन करीता,ती विद्यासिध्दी शुन्य,
मारुनी खाटकाचे हात तलवार झाले तरी
परिसस्पर्शाने ते सोने होणार नाही का ?
ललाटावरी विभूती धारण करीता
पापपरिहार होणार नाही का कूडलसंगमदेवा.

अशा प्रकारे लिंगायतांना विभूतीचे महत्त्व महात्मा बसवण्णांनी विशद केले आहे.

🔯🌷 रुद्राक्ष 🌷🔯

रुद्राक्ष याचा अर्थ रुद्र म्हणजे “शिव” अक्ष म्हणजे दृष्टी.म्हणजेच रुद्राक्ष म्हणजे शिवदृष्टी,शिवदृष्टी म्हणजे विश्वात सर्वाना समान पाहणारी दृष्टी होय.
रुद्राक्ष धारणा करणे म्हणजे संकुचित,स्वार्थी,स्वहित,मतलबी भाव सोडून सकलविश्व शिवाच्या दृष्टीने पाहणे होय.
रुद्राक्ष धारण करण्याचे आरोग्य विषयक फायद्या बरोबर सामाजिक निती,मानसीकता समृद्धी चे प्रतिक म्हणून रुद्राक्ष कडे पाहिले जाते.
रुद्राक्ष शिवाचे अक्ष आहे व याचे महत्व व वैशिष्ट्ये,महात्म्य सांगताना महात्मा बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात
“देवा मज रुद्राक्ष सर्वपावन,देवा, मज रुद्राक्ष सर्वकारण
देवा, मज रुद्राक्ष सर्वसाधन,देवा,मज रुद्राक्ष सर्वसिध्दी,
देवा,मज रुद्राक्ष सर्वपापक्षय,
देवा,आपली पाचमुखेच पंचमुखी रुद्राक्ष आहे.
देवा,कूडलसंगमदेवा माझ्या मुक्तीपथाचे साधन श्रीमहारुद्राक्ष आहे.

अशा प्रकारे रुद्राक्ष धारणेचे आध्यात्मिक महत्त्व महात्मा बसवण्णांनी केले आहे.

🔯🌷 मंत्र 🌷🔯

आध्यात्मिक साधनेचा एक मार्ग म्हणून मंत्र या आवरणाला लिंगायत धर्मात विशेष स्थान आहे.
मंत्र या शब्दाचा अर्थ “पवित्र” असा आहे. “ॐ नमः शिवाय”
हा षडक्षरी मंत्र व या मंत्राचा जयघोष लिंगायतांनी आपल्या जिव्हेवर सतत ठेवून केला पाहीजे.महात्मा बसवण्णा तर इतर काही पठण करण्यापेक्षा ॐ नमः शिवाय याच मंत्राचा जयघोष करण्यास सांगतात
ॐ नमः शिवाय या षडक्षरी मंत्र हा लिंगायतांच्या नसानसात ठासून भरलेला असावा हे सांगताना महात्मा बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात,
तुमचे स्मरणचि मज उदय,
तुमचे विस्मरणचि मज अस्त.
तुमचे स्मरणचि मम जीवन,
तुमचे स्मरणचि मम प्राण पहा,बापा.
स्वामी,मम हृदयी तव चरणमुद्रा उमटवा हो,
माझ्या जिभेवरी षडक्षरी लिहा हो कूडलसंगमदेवा.

         अशा प्रकारे षडक्षरी मंत्र अंतरंगात पसरलेला असला पाहिजे.

अशा प्रकारे लिंगायत धर्मातील लिंगायताचे बाह्य अष्टावरण व त्याचे स्वरुप आहे.
अष्टावरण ही लिंगायतांची ओळख आहे व या अष्टावरण मार्गाचा तंतोतंत पालन लिंगायतांनी करायला हवे. शरणु शरणार्थी
बसवदास — सुनिल समाने

Recent Posts

  • अष्टावरण

Recent Comments

    Archives

    • February 2019

    Categories

    • Uncategorized

    Meta

    • Log in
    • Entries RSS
    • Comments RSS
    • WordPress.org
    ©2019 Lingayat World | WordPress Theme by Superb WordPress Themes